Trust img
Select City
गर्भावस्थेत पाठदुखी: कारणे आणि आराम

गर्भावस्थेत पाठदुखी: कारणे आणि आराम

doctor image
Dr. Prachi Benara

MBBS (Gold Medalist), MS (OBG), DNB (OBG), PG Diploma in Reproductive and Sexual health

16 Years of experience
Google
Add as a preferred
source on Google

गर्भावस्थेत पाठदुखी ही अनेक महिलांना जाणवणारी तक्रार आहे. सकाळी उठताना कंबर आखडते. काहींना थोडा वेळ बसले तरी पाठ ठणकते. शरीरात होणारे बदल यामागे असतात, म्हणून ही वेदना सामान्य मानली जाते.

बहुतेक वेळा ही वेदना सौम्य असते आणि थोड्या काळजीने कमी होते. मात्र गर्भावस्थेत पाठदुखी तीव्र झाली, तर डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. या लेखात आपण कारणे, उपचार, घरगुती उपाय आणि व्यायाम पाहणार आहोत. शेवटी कोणती लक्षणे धोक्याची आहेत, तेही समजून घेऊ.

गर्भावस्थेत पाठदुखी का होते?

गर्भाशय वाढते, तशी शरीराची रचना हळूहळू बदलत जाते. त्याचा ताण थेट पाठीच्या स्नायूंवर आणि कंबरेवर येतो. या त्रासामागची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • हार्मोन्समधील बदल: गर्भावस्थेत रिलॅक्सिन हार्मोन तयार होते. ते सांधे आणि अस्थिबंधने सैल करते. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना जास्त काम करावे लागते.
  • वाढते वजन: गर्भाशय आणि बाळाचे वजन वाढत जाते. त्याचा भार पाठीच्या खालच्या भागावर पडतो.
  • शरीराच्या ठेवणीत बदल: पोट पुढे येते आणि शरीराचा तोल बदलतो. तो सांभाळताना पाठीचे स्नायू लवकर थकतात.
  • चुकीची ठेवण: चुकीच्या पद्धतीने बसणे, सतत उभे राहणे किंवा जड वस्तू उचलणे यामुळे वेदना वाढू शकतात.
  • थकवा आणि तणाव: पुरेशी विश्रांती न मिळाल्यास स्नायू ताठ होतात. मानसिक तणाव वाढला, की हा त्रास आणखी जाणवतो.

गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात पाठदुखी का होते?

पहिल्या महिन्यात पोटाचा आकार फारसा वाढलेला नसतो. तरीही काही महिलांना या काळात पाठदुखी सुरू होते. हार्मोन्समधील बदल आणि थकवा हे त्यामागचे प्रमुख कारण असते.

याशिवाय गर्भ गर्भाशयात रुजताना काही महिलांना हलकी कंबरदुखी जाणवू शकते. इम्प्लांटेशनची लक्षणे म्हणून पोटात हलके ओढल्यासारखेही वाटते. तेव्हा अनेकींना गर्भधारणा झाल्याचे माहीतही नसते. मासिक पाळीपूर्वीच्या त्रासासारखेच हे वाटते, म्हणून गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे ओळखणे उपयोगी ठरते.

मात्र पाठदुखीसोबत रक्तस्राव होत असेल, तर लगेच डॉक्टरांकडे जा. पोटाच्या एका बाजूला तीव्र वेदना असतील, तरीही वाट पाहू नका.

गर्भावस्थेत पाठदुखी केव्हा सुरू होते?

हे प्रत्येक महिलेनुसार वेगळे असते. काहींना पहिल्या तिमाहीतच त्रास सुरू होतो, तर काहींना नंतरच्या टप्प्यांत. तिमाहीनुसार वेदनेचे स्वरूप साधारण असे बदलते.

  • पहिली तिमाही: हार्मोन्समधील बदलांमुळे सौम्य वेदना होऊ शकते.
  • दुसरी तिमाही: पोट वाढू लागते. शरीराचा तोल बदलतो आणि कंबरेवर ताण येतो.
  • तिसरी तिमाही: बाळाचे वजन वाढल्याने पाठीच्या खालच्या भागातील वेदना जास्त जाणवते.

गर्भावस्थेत शरीराच्या कोणत्या भागांमध्ये पाठदुखी होऊ शकते?

वेदना फक्त पाठीपुरती मर्यादित नसते. काही महिलांना कंबर, नितंब किंवा खांद्यांपर्यंतही त्रास होतो. कोणत्या भागात काय जाणवते, ते खाली पाहा.

  • कंबरेचा खालचा भाग: वाढलेल्या वजनामुळे या भागावर सर्वाधिक ताण येतो.
  • पाठीचा वरचा भाग आणि खांदे: ठेवण बदलल्याने येथील स्नायू ताठ होतात.
  • नितंब आणि श्रोणीचा भाग: सांध्यांवर ताण आल्याने बसताना किंवा चालताना वेदना होतात.
  • पायांपर्यंत पसरणारी वेदना: कधी कधी नसांवर दाब येतो. मग वेदना नितंबापासून पायापर्यंत जाते.

गर्भावस्थेतील पाठदुखीवरील उपचार

उपचार वेदनेचे कारण आणि तीव्रता पाहून ठरतात. म्हणूनच डॉक्टर आधी तपासणी करतात. त्यानंतर ते खालीलपैकी काही पर्याय सुचवू शकतात.

  • गर्भवती महिलांसाठी योग्य फिजिओथेरपी.
  • पाठीला आधार देणारा मॅटर्निटी सपोर्ट बेल्ट.
  • तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हलका व्यायाम.
  • गरज असल्यास डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे.

शरीरात कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी कमी असेल, तर डॉक्टर पूरक आहार देऊ शकतात. स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नका. आयबुप्रोफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात घेऊ नका.

गर्भावस्थेतील पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

काही सोप्या सवयींमुळे वेदना कमी होऊ शकते. मात्र हे उपाय डॉक्टरांच्या उपचारांना पर्याय नाहीत. वेदना वाढत असेल, तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका.

  • कोमट शेक: कंबरेवर कोमट शेक घ्या. खूप गरम शेक टाळा.
  • झोपण्याची स्थिती: कुशीवर झोपा आणि गुडघ्यांमध्ये उशी ठेवा.
  • योग्य आधार: बसताना पाठीमागे लहान उशी ठेवा.
  • हलका मसाज: गर्भवती महिलांच्या मसाजचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीकडूनच मसाज करून घ्या.
  • विश्रांती: एकाच स्थितीत जास्त वेळ राहू नका. मधे मधे थोडी हालचाल करा.
  • पौष्टिक आहार: संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

गर्भावस्थेतील पाठदुखीसाठी कोणते व्यायाम उपयुक्त ठरू शकतात?

योग्य व्यायामामुळे स्नायू मजबूत राहतात. त्यामुळे पाठीवरचा ताण कमी होण्यास मदत होते. तरीही सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घ्या. खालील व्यायाम अनेक गर्भवती महिलांना उपयोगी ठरतात.

  • हलके चालणे: आरामदायक गतीने रोज चाला.
  • पेल्विक टिल्ट: तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली श्रोणीचा हलका व्यायाम करा.
  • कॅट-काऊ स्ट्रेच: हात आणि गुडघ्यांवर टेकून पाठीची हळुवार हालचाल करा.
  • गर्भवतींसाठी योग: प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली सुरक्षित योगासने करा.

व्यायाम करताना वेदना, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवली, तर लगेच थांबा.

गर्भावस्थेत पाठदुखी टाळण्याचे मार्ग

रोजच्या सवयी थोड्या बदलल्या, तरी कंबरेवरचा ताण कमी होतो. त्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नसते. खालील सूचना पाळून पाहा.

  • बसताना पाठ सरळ ठेवा आणि आधार घ्या.
  • जड वस्तू उचलू नका.
  • वस्तू उचलताना कंबरेऐवजी गुडघे वाकवा.
  • कमी टाचेची आरामदायक चप्पल किंवा बूट वापरा.
  • खूप वेळ बसू नका किंवा उभे राहू नका.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज थोडी हालचाल करा.

गर्भावस्थेत पाठदुखी कधी गंभीर होऊ शकते?

सौम्य पाठदुखी सामान्य असते. पण तीव्र पाठदुखी असेल, तर सावध राहावे लागते. काही लक्षणे गंभीर समस्येचा इशारा देतात. खालील लक्षणे दिसली, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

  • योनीतून रक्तस्राव होणे किंवा पाण्यासारखा द्रव जाणे.
  • ताप येणे किंवा लघवी करताना जळजळ होणे.
  • ठरावीक अंतराने पोटात कळा येणे.
  • पायांमध्ये नवीन बधिरपणा किंवा अशक्तपणा जाणवणे.
  • लघवी किंवा शौचावरील नियंत्रण कमी होणे.

तीव्र वेदनेसोबत रक्तस्राव किंवा चक्कर येत असेल, तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या. ही गर्भपाताची लक्षणे किंवा गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा यांचीही असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • गर्भावस्थेत पाठदुखी कोणत्या महिन्यात सुरू होते?

गर्भावस्थेत पाठदुखी पहिल्या महिन्यापासूनही सुरू होऊ शकते. मात्र बहुतेक महिलांना ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत जास्त जाणवते. पोट वाढते, तसा पाठीवरचा ताण वाढत जातो.

  • गर्भावस्थेत सतत पाठदुखी असणे सामान्य आहे का?

अधूनमधून होणारी सौम्य पाठदुखी सामान्य असते. पण गर्भावस्थेत सतत पाठदुखी राहत असेल किंवा वाढत असेल, तर डॉक्टरांना दाखवा. विश्रांती घेऊनही आराम मिळाला नाही, तर तपासणी करून घेणे योग्य ठरते.

  • गर्भावस्थेत कंबरदुखीसाठी कोणते स्ट्रेचिंग व्यायाम मदत करू शकतात?

कॅट-काऊ स्ट्रेच आणि पेल्विक टिल्ट कंबरदुखीसाठी अनेक महिलांना उपयोगी ठरतात. हे व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घ्या. सुरुवातीला प्रशिक्षित व्यक्तीकडून ते शिकून घेणे चांगले.

  • गर्भावस्थेत पाठदुखीसाठी कोणते औषध घेता येते?

कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांना विचारा. काही वेळा डॉक्टर पॅरासिटामॉल घेण्यास सांगतात. पण पाठदुखीसाठी औषध गरजेचे आहे का आणि किती घ्यायचे, हे डॉक्टरच ठरवतील.

  • गर्भावस्थेत कोणत्या बसण्याच्या स्थिती टाळाव्यात?

पाठीला आधार न देता वाकून बसू नका. एकाच स्थितीत खूप वेळ बसणेही टाळा. बसताना पाठीमागे उशी ठेवा आणि पाय जमिनीवर नीट टेकवा. यामुळे पाठदुखीचा त्रास कमी होतो.

  • गर्भावस्थेतील पाठदुखी किती काळ टिकते?

हे वेदनेच्या कारणावर अवलंबून असते. काही महिलांना प्रसूतीपूर्वीच आराम मिळतो. काहींना प्रसूतीनंतरही काही काळ पाठदुखी जाणवते.

  • गर्भावस्थेत पाठदुखी सामान्य आहे का?

होय, गर्भावस्थेत सौम्य पाठदुखी सामान्य आहे. बहुतेक गर्भवती महिलांना हा त्रास होतो. मात्र वेदना तीव्र असतील किंवा इतर असामान्य लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

To know more

Birla Fertility & IVF aims at transforming the future of fertility globally, through outstanding clinical outcomes, research, innovation and compassionate care.

Need Help?

Talk to our fertility experts

Had an IVF Failure?

Talk to our fertility experts